मुंबई- पुणे असा प्रवास दर दिवशी अनेकजण करतात. रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गानं हा प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. अशा या प्रवासामध्ये आता वेळेची बचत आणखी वाढली असून काही तास नव्हे तर काही मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे. ज्यामुळं येत्या काळात हा प्रवास करणाऱ्यांचा आकडा वाढण्याचा अंदाज असला तरीही प्रवासासाठीच्या वाटांचे पर्याय उपलब्ध असल्यानं प्रवाशांना उत्तम सोय उपलब्ध होणार असं म्हणायला हरकत नाही. सोप्या शब्दांत सांगावं तर, हा तिसरा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे असेल. ज्यासाठीच्या आराखडा कामास सुरुवात झाली असून, ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने’ (NHAI) नं यासाठीची तयारीसुद्धा सुरू केली आहे.
कुठून कुठपर्यंत असेल हा नवा रस्ता?
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान, किमान वेळात व्हाना यासाठी एनएचएआय नं तयार केलेल्या आराखड्यात काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतू असणाऱ्या अटल सेतूची या मार्गासाठी महत्त्वाची भूमिका असेल. इथून हा महामार्ग चौक-पुणे, शिवारे असा साधारण 130 किमीचा टप्पा प्रवाशांसाठी सुकर प्रवास सुनिश्चित करणार आहे. अटल सेतूचा टप्पा जिथं संपतो तिथूनच हा महामार्ग सुरू होईल आणि पुणे रिंग रोडला पुढे पुणे-बंगळूरू द्रुतगती महामार्गाला मिळेल. यामध्ये एकूण अंतरापैकी 30 किमीच्या महामार्गाचा आराखडा तयार असून लवकरच त्यासाठीच्या कामाला सुरुवातही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वरित 100 किमीचा रस्ता चौक ते शिवारे, पुणे या अंतरासाठी असून एकूण प्रकल्पासाठी 15 हजार कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित असून, त्यासाठीच्या निविदासुद्धा मागवण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्षात जेव्हा हा संपूर्ण रस्ता प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल तेव्हा मुंबई ते पुणे हा संपूर्ण प्रवास फक्त 90 मिनिटांत करता येणार आहे, असा दावा NHAI नं केला आहे. तेव्हा या वाटेवर प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची आणखी बचत होणार असं म्हणायला हरकत नाही.
तिसऱ्या मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेची गरज का भासली?
जुना मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि सध्या अनेकांच्याच वापरात असणारा नवा मुंबई पुणे एक्स्प्रेस वे यांच्या उपलब्धतेतून मुंबई आणि पुणे हा प्रवास अडीच तासांमध्ये पूर्ण करता येतो. मात्र, सलग सुट्ट्या, आठवडी सुट्ट्या आणि तत्सम कारणांनी या मार्गांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. येत्या काळात या मार्गानं प्रवास करणाऱ्यांचा आकडा आणखी वाढण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाऱ्या असंख्य सुविधा, नवी मुंबई विमानतळाची वाढती व्याप्ती पाहया तिसरा मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वाढत्या वाहनांचा ओघ पाहता गेम चेंजर ठरणार असं म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्षात NHAI कडून बांधल्या जाणाऱ्या पुणे-बंगळूरू महामार्गाचा विस्तार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून केला जाणार आहे, जो तिसरा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे म्हणूनही ओळखला जाईल.
