नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील बहुचर्चित दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलगच्या दोन पुतण्यांनाही अटक करण्यात आली आहे. अभिषेक कडलग आणि ओम कडलग या दोघांना त्र्यंबकेश्वर पोलीसांनी मंगळवारी रात्री अटक केली. पुतण्यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम हा काळाबाजाराचे रॅकेट चालवायचा असं उघड झालं आहे. कडलगचे दोन पुतणे एजंटकडून पैसे घ्यायचे आणि पुरुषोत्तमला फोन लावत भाविकांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था करून द्यायचे. आरोपींचे आणखी साथीदार कोण ? याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातील पवित्र कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्ताला अटक करण्यात आली आहे. मंदिर संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्याने कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडालीय.. नेमकं काय प्रकरण आहे?
3 हजार रुपये द्या 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो अशी ऑफर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाचा बाजार मांडणा-या विश्वस्ताला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पास घोटाळा होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. पोलिसांनी या तक्रारींची दखल घेत स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाविक म्हणून गेलेल्या पोलिसांना 3 हजार रुपये द्या 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो अशी ऑफर देण्यात आली. यासाठी त्र्यंबकेश्वराच्या पूर्व दरवाजातून व्हिआयपी दर्शन घडवलं जायचं. पोलिसांनी या प्रकरणी भक्तांना ऑफर देणा-या गोटिराम पेहेरेला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत या प्रकरणातला मास्टरमाईंड पुरुषोत्तम कडलगला अटक केलीय आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोप
भाजपाने या प्रकरणी राजकीय आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अटक केलेला आरोपी हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे. नास्तिक मानसिकतेतून कडलगनं दर्शनाचा बाजार मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी तर याहून मोठा आरोप केलाय. मंदिराच्या विश्वस्तपदी नियुक्तीसाठी सरकारी अधिकारी कोट्यवधी रुपयांची बोली लावतात. कडलगनंही विश्वस्तपद तसंच मिळवल्याचा आरोप ललिता शिंदेंनी केला आहे. पुरुषोत्तम कडलग याच्या वकिलांनी मात्र पोलिसांनी केलेले आरोप फेटाळलेत. पुरुषोत्तम कडलग याच्यावर दर्शन घोटाळ्याचे स्पष्ट आरोप नसताना पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वरच्या दर्शन रांगेत भक्तांना मारहाण होणे, धक्काबुक्की होणं हे प्रकार याआधी समोर आले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना लुटणारं एक रॅकेटच कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. कडलग त्या साखळीच्या एक भाग असल्यास संपूर्ण साखळीच पोलिसांनी उद्ध्वस्त करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
