सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या स्तराला जाऊ शकता? बंगळुरुमधील कुटुंबाने प्रसिद्ध होण्याच्या नादात जे काही केलं आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण त्यांनी फक्त रील व्हायरल व्हावं यासाठी चक्क आपल्या वडिलांना पोत्यात भरलं होतं. इतकंच नाही तर कुटुंबाने पोत्यासह त्यांना कुरिअर करण्याचा प्रयत्न केला. कुरिअर कर्मचाऱ्यांना संशय आल्याने सत्य उघड झालं. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं
नेमकं काय झालं?
कुटुंबातील पाच सदस्य मंगळवारी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. महिला, तिचा पती, सासू आणि दीर कुरिअर पार्सल करण्याच्या हेतूने कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्याकडे मोठं पोतं होतं. कुरिअर कर्मचाऱ्यांनी आतमध्ये काय आहे विचारलं असता, कुटुंबीयांनी काही उत्तर दिलं नाही.
कुरिअर कर्मचाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी हे पॅकेज उघडून पाहिलं. यावेळी आत जे दिसलं ते पाहून सर्व कर्मचारी हादरले. आतमध्ये चक्क एक वृद्ध व्यक्ती होता. एका व्यक्तीला कुरिअर करण्याचा प्रयत्न झाल्याने कुरिअर कर्मचारी आश्चर्यचकित झाले आणि त्याचवेळी धक्काही बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृद्ध व्यक्तीला नीट दिसत नव्हतं. तसंच पोत्यात भरल्याने त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.
कुटुंबाने दावा केला आहेकी, त्यांनी सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी हे कृत्य केलं. आपल्याला या माध्यमातून बस तिकीट कशाप्रकारे विकली जातात हे उघड करायचं होतं असा दावा त्यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, उगादी आणि रमझान या सणांच्या वेळी बसचे तिकीट फार महाग विकले जातात आणि त्यामुळे व्यक्तीला कुरिअर करणं हा एकमेव पर्याय असल्याचं आपल्याला दाखवून द्यायचं होतं असा दावा कुटुंबाने केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, कुरिअर कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतरही कुटुंबीय कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते. आपण इतका प्रवास आणि मेहनत करुन इथपर्यंत आलो असताना हे पार्सल स्विकारावं असं त्यांचं म्हणणं होतं.
यानंतर अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. कुरिअर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. तिथे त्यांनी माफी मागितली असून, त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला. आपलं वागणं अत्यंत बेजबाबदार असल्याचं त्यांनी मान्य केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना चेतावणी देत सोडून दिलं आहे. भविष्यात पुन्हा असं कृत्य करु नये अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.
