पांढऱ्या फॉर्च्युनर गाडीतून मोठा गांजाचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला. पूर्ण तयारी करत संशयित वाहनाची वाट पाहत पोलिसांनी रात्र काढली. अखेर पहाटे गाडी दिसताच कारवाई करत एका तरुणाला पकडण्यात यश आलं. या कारवाईत तब्बल 40 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितम रविंद्र कुंजीर (वय 32, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) याला अटक करण्यात आली आहे.
रात्री गुप्तपणे सापळा रचला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी थेऊर परिसरात आणला जाणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी 10 मार्च मंगळवारी रोजी रात्री गुप्तपणे सापळा रचला. परिसरात पोलिसांनी नजर ठेवत संशयित वाहनाची वाट पाहण्यास सुरुवात केली.
40 लाखाचा मुद्देमाल जप्त
रात्रभर पोलिसांनी वाट पहिली पण गाडीचा पत्ता नव्हता. मात्र, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास एक पांढरी फॉर्च्युनर त्या भागात येताना दिसली. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवून चालकाची चौकशी केली. सुरुवातीला काहीच संशयास्पद वाटत नव्हते, पण गाडीची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी प्रितम कुंजीर याला ताब्यात घेतलं.
या कारवाईत पोलिसांनी 53 किलो 14 ग्रॅम गांजा अंदाजे 30 लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर कार आणि मोबाईल फोन असा एकूण 40 लाख 70 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या पथकाने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
