नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गर्भवती ऊसतोड महिला वाहतूक कुंडीत अडकल्याने रिक्षामध्येच डिलिव्हरी अर्थात प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे. सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या वाहतूक कोंडीत सोलापूर जिल्ह्यातून ऊस तोडी करून मनमाड मार्गे नंदुरबार जिल्ह्यातील केळीपणी येथे घरी परतत असताना मनमाडच्या वाहतूक कोंडीत गर्भवती मजीला आवेश वडवे या महिलेल्या प्रसूतीच्या कडा अचानक सुरू झाल्या.
वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णालय कसे गाठावे असा प्रश्न डोळ्यासमोर उभे असतानाच शहरातील कॅम्प विभागातून गावात येणाऱ्या अमजद अत्तर या रिक्षा चालकाला सदरील महिला व त्यांचे कुटुंब दिसले.. त्यांनीदेखील माणुसकी दाखवत रिक्षामध्ये सदरील कुटुंब व गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बसवले मात्र वाहतूक कोंडीत एवढी होती की साध पायी चालणंही मुश्किल होतं.. रितेश पगारे या सामाजिक कार्यकर्त्याने दुचाकी वर रस्ता मोकळा करत अखेर रिक्षाला रुग्णालयात पोहोचवले मात्र भर रस्त्यातच या गर्भवती महिलेची प्रसुती झाली. माणुसकीचा दर्शन घडवणारा रिक्षाचालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळंतपण महिला व बाळ सध्या सुखरूप आहे.
इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कधी अवजड वाहनांमुळे तर कधी अपघातांमुळे तर कधी तांत्रिक बिघाडीमुळे वाहतूक कोंडी नेहमीच होत असते यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालय गाठताना आल्याने प्राण देखील गमावल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. एकंदरच संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडीवर सोडगा काढावा हीच माफक अपेक्षा.
असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पुणे-इंदोर महामार्गावर सतत वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. जवळजवळ दररोजच नागरिकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशात एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे, एका महिलेची रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगार्यावरच प्रसूती झाल्याची बातमी समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे आईचा आणि बाळाचा जीव वाचला.
नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे- इंदोर महामार्गावर सावरगाव शिवारात पहाटेच्या सुमारास एका परप्रांतीय महिलेची रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगार्यावरच प्रसूती झाली. 24 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत सदरची महिला व तिचे कुटुंब अडकले होते. दरम्यान पहाटे येवल्यातून मनमाड कडे जाताना सावरगाव जवळ या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या मात्र वाहतूक एकाच जागी थांबली असल्याने महिलेला प्रसूती कळा सहाय्य झाल्या. सदरची महिला वाहनातून खाली उतरताच तिची रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्यावर प्रसूती झाली.
