नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटची सध्या देशभरात चर्चा आहे. हल्लीच गलगोटिया विद्यापीठाच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक रोबोटिक डॉग ‘ओरियन’ विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने तयार केल्याचे त्या सांगताना दिसतायत. यानंतर देशासह जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं. दरम्यान प्रोफेसर नेहा यांनी आपलं लिंक्डइन प्रोफाइल अपडेट केलंय.
काय नेमकं प्रकरण?
गलगोटिया विद्यापीठ एआय क्षेत्रात 350 कोटी रुपयांचा गुंतवणूक करत असल्याचे प्रोफेसर नेहा व्हिडीओमध्ये सांगताना दिसतायत. मात्र हा रोबोट खरं तर चीनच्या युनिट्री कंपनीचा ‘Go2’ मॉडेल आहे, जो बाजारात फक्त 2 ते 3 लाख रुपयांना मिळतो. नेहा यांना बोलण्याची अधिकृत परवानगीही नव्हती. पण प्रोफेसर नेहा यांनी उत्साहात आल्याने कॅमेर्यासमोर चुकीची माहिती दिली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद
प्रोफेसरच्या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि नेटकऱ्यांनी लगेच ओळखले की, हा रोबोट चीनचा आहे आणि गलगोटियाने तो बनवलेलाच नाही. याचबरोबर विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये ड्रोन सुरुवातीपासून तयार केल्याचा दावा केला होता, तोही 40 हजार रुपयांचा तयार मॉडेल ‘स्ट्राइककर V3’ असल्याचे समोर आले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात आली.
विद्यापीठावर माफी मागण्याची वेळ
वाद वाढताच गलगोटिया विद्यापीठाने लगेच स्पष्टीकरण दिले. “आम्ही हा रोबोट बनवलेला नाही आणि कधीही असा दावा केलेला नाही. आम्ही फक्त भविष्यात अशी तंत्रज्ञान तयार करणारे विद्यार्थी घडवत आहोत.”, असे विद्यापीठाने म्हटले. या सर्व प्रकारासाठी विद्यापीठाने प्रोफेसरला जबाबदार धरले आणि माफी मागितली. ‘खोटी माहिती सहन केली जाणार नाही. एक्स्पोमध्ये फक्त खरे काम दाखवावे’, असे केंद्रीय आयटी सचिव एस. कृष्णन यांनी स्पष्ट केले. यानंतर सरकारने गलगोटिया विद्यापीठाला संपूर्ण एआय समिटमधून बाहेर काढले.
प्रोफेसर नेहा सिंहकडून प्रोफाइल अपडेट
संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रोफेसर नेहा सिंह यांना विद्यापीठातील आपली नोकरी गमवावी लागल्याची चर्चा सुरु आहे. अशातच नेहा यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर ‘ओपन टू वर्क’ असा स्टेटस लावला आहे. याचा अर्थ त्यांना आता नवीन नोकरी शोधायची आहे. विद्यापीठाने त्यांना जबाबदार ठरवल्याने त्यांची स्थिती बिकट झाली असल्याचे दिसते.
रोबोटची खासियत
युनिट्री Go2 हा ४डी लिडार तंत्रज्ञानाने बनलेला हुशार रोबोट आहे. तो पायऱ्या चढतो, खडबडीत रस्त्यावर चालतो, अडथळे ओळखतो आणि आवाजाच्या आज्ञेनुसार काम करतो. यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मशीन लर्निंग एकत्र येतात. गलगोटिया विद्यापीठ 2011 मध्ये ग्रेटर नोएडामध्ये सुरू झाले. येथे 20 स्कूल्समध्ये डिप्लोमा ते पीएचडीपर्यंत 200 हून अधिक अभ्यासक्रम चालतात. चांसलर सुनील गलगोटिया आणि सीईओ ध्रुव गलगोटिया यांच्या नेतृत्वात हे विद्यापीठ कार्यरत आहे. मात्र या वादामुळे त्यांची प्रतिमा बिघडली आहे.
