शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात संतापजनक कृत्य, शिवपुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्य; नेमका प्रकार काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह राज्यभर पसरला असताना, कोल्हापुरात करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने हा उत्सव कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित यात्रेदरम्यान ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांच्या अनभिज्ञतेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुतळ्यासमोर धिंगाणा; ग्रामस्थांना कळेना

बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्री उशिरा पार पडलेल्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत इमारतीच्या दर्शनी भागात स्टेज उभारण्यात आले होता. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून मध्येच लावणीच्या नावाखाली आइटम सॉंगवर बिभित्स नृत्य सुरू झाले. महाशिवरात्र यात्रेच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते, परंतु भजन-कीर्तन किंवा सत्संगाची अपेक्षा असताना असा कार्यक्रम कोणत्या उद्देशाने ठेवला, असा सवाल शिवप्रेमी उपस्थित करत आहेत.

वडणगे ग्रामपंचायतीचा वादग्रस्त इतिहास

वडणगे ग्रामपंचायत पूर्वीही विविध वादात सापडली आहे. गेल्या वर्षी बेकायदा बैलगाडी शर्यतीमुळे सरपंचांसह कार्यकारिणीवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी डांबरी रस्त्यावर शर्यत घेताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. आदल्या वर्षी शर्यतीवरून दोन गटांत हाणामारी होऊन गुन्हे नोंदले गेले. तरीही ग्रामपंचायतीच्या वागणुकीत कोणताही सुधारणा झालेली नाही, असे स्थानिक सुज्ञ नागरिक सांगतात. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

शिवभक्तांचा संताप; राजकीय आशिर्वादाचा संशय

“शिवजयंतीच्या तोंडावर पुतळ्यासमोर पडदा लावून असे कार्यक्रम कसे चालवता येतील? हे राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याशिवाय शक्य नाही,” अशी भावना शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. मागील 3-4 वर्षांपासून ग्रामपंचायत इमारतीसमोर असे कार्यक्रम होत असल्याचेही सांगितले जाते. टीपू सुलतान आणि शिवरायांच्या तुलनेवरून राज्यात तणाव असताना असा प्रकार होणे अत्यंत असंयुक्तिक आहे. निदान दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेता आला असता, असे मत सुज्ञ नागरिकांनी मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *