प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं या कवीवर्यं मगेश पाडगावकरांच्या अजरामर ओळी. पण एका महिलेला मात्र चक्क एलॉन मस्कवर प्रेम झालं. एलोन मस्कसोबत आपलं लग्न व्हावं हे तिचं स्वप्न. एलोन मस्क म्हणजे कोण तर जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक. एक्स, स्पेसेक्स सारख्या कंपन्यांचा मालक आणि टेस्लाचा सहसंस्थापक. मस्कसोबत एक फोटो मिळावा किंवा एक भेट मिळावी ही जगभरातल्या अनेकांची इच्छा आणि अनेकांना स्वप्नवत. पण मुंबईतल्या चेंबुरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने मात्र हे स्वप्न बघितलं आणि ते पुर्ण होतंय असंही तिला वाटलं कारण एलन मस्कसोबत या महिलेचं सोशल मीडियावर चॅटिंग सुरु झालं.
एक दिवस अचानक मस्क नावाच्या एका एक्स अकाऊंटवरुन तिला मेसेज आला.आता आपण बघितलेलं सर्वात मोठ्ठं स्वप्न प्रत्यक्षात आकाराला येतंय म्हटल्यावर कोणीही हुरळून जाणारच. मग काय प्रेमाच्या लाटेवर स्वार झालेल्या या महिलेचं मस्कसोबत चॅटिंग तासनतास गप्पा सुरु झाल्या. तिला वाटलं तिचं नशीबच आता पालटलं. आणि तसं वाटणंही साहजिक आहे.. एक दिवस त्याने या महिलेला लग्नाची मागणी घातली….अमेरिकेत अलिशान लाईफस्टाईचं स्वप्न दाखवलं. आणि त्यानंतर जे घडलं ते मात्र धक्कादायक होतं. कारण ज्या व्यक्तीसोबत ती बोलत होती तो एलन मस्क नसून त्याच्या नावाने उघडलेलं एक फेक अकाऊंट होतं.
हे अकाऊंट चालवणाऱ्या जेम्स नवााच्या व्यक्तीने मुंबईतल्या चेमबुरमध्ये राहणाऱ्या या ४० वर्षीय महिलेला स्वतःच्या जाळ्यात ओढून वेगवेगल्या मार्गाने पैसे पाठवायला सांगितले. जेणेकरुन संबंधित महिलेचा व्हीसा लवकर येईल असं कारण दिलं. नंतर तिकीटासाठी २ -२ लाख मागितले. या नादात जवळपास १६ लाख ३४ हजार रुपये या महिलेने खर्चही केले. आता एक साधी गोष्ट आहे लाखो कोटींचा मालक असलेला व्यक्ती काही लाख रुपये मागणं शक्य तरी आहे का.
हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पण मस्कच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेला मात्र जरा उशीरा पडला. पण तोपर्यंत लाखो रुपयांची फसवणूक झालेली होती. त्यामुळे झालेली चुक लक्षात येईपर्यंत स्वप्न पण भंगल आणि हातातले पैसे पण गेले होते. ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान हे सगळं सुर होतं. त्यामुळे आपला जीवनसाथी शोधताना आपलं एक बेसावध पाऊल आणि आपण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू शकतो. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आणि इथे प्रेमाची स्वप्न बघताना खातरजमा करुनच प्रत्येक पाऊल टाका नाहीतर याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते.
