दुर्दैवी! मुंबईत स्पीकर अंगावर पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू;

मागील 24 तासांमध्ये मुंबईसह देशभरात सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला तो म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा. देश 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच या दिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी कार्यक्रम, पूजा किंवा तत्सम उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतही हेच चित्र पाहायला मिळालं. मात्र, विक्रोळीत या उत्साही वातावरणाता अतिशय दुर्दैवी घटनेमुळं गालबोट लागलं. घटनेची माहिती पुढे येताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. कारण, काही सेकंदांच्या बेसावधपणानं एका चिमुकलीचा जीव घेतला.

कुठे घडली ही घटना? 

मुंबईच्या विक्रोळी परिसराच 26 जानेवारी 2026 रोजी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये असणाऱ्या आंबेडकर नगर इथं परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला एक स्पीकर साधारण 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडला आणि या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू ओढावला. सदर घटना अतिशय हृदयद्रावक असून त्याचा अवघ्या काही सेकंदांचा अंगावर काटा आणणारा आणि भीतीनं किंकाळी फोडण्यास भाग पाडणारा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अनेकांनाच धडकी भरवत असून, विक्रोळी परिसरात या घटनेमुळं शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त विक्रोळीच्या आंबेडकर नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी इथं परिसरात मोठे स्पीकरही लावण्यात आले होते. तेव्हात चिंचोळ्या वाटेवरून नेहमीची ये- जा सुरू असताना, ही चिमुकली खेळता खेळता धावत आली आणि तिच्या अंगावर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला स्पीकर पडला. हा आघात अतिशय भयंकर स्वरुपातील असल्यानं ती या अपघातात गंभीररित्या जखमी झाली. ज्यानंतर लगेचच तिथं असणाऱ्या नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *