स्कूल व्हॅनमध्ये बसली, पण लेक उशीरा घरी पोहोचली, भेदरलेल्या चिमुकलीनं आईला सारं सांगितलं; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर शहर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलं आहे. बदलापुरात एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. एका स्कूल व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक शोषण केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना स्कूल व्हॅनचालकाने तिच्यासोबत संतापजनक कृत्य केलं. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीनं आई वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. विद्यार्थिनीला लैंगिक शोषणासह मारहाणही झाली होती. संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीत चेंदवणकर यांनी केला. दरम्यान, हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड मारला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेनंतर बदलापूर पोलीस ठाण्यातही तणावाचं वातावरण होतं.

नेमकी घटना काय?

बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅनमधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत, पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड

बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTOने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *