गोव्यात रशियन सीरिअल किलर? दोघींची गळा कापून हत्या, मोबाईल तपासला तर सापडले तब्बल 100 महिला आणि 2 पुरुषांचे फोटो

रशियन नागरिक असलेल्या अलेक्सेई लिओनोव्हने गोव्यात आपल्या दोन मैत्रिणींची उसणे घेतलेल्या पैशांवरून आणि ‘रबर क्राउन’वरून हत्या केली असावी, अशी माहिती गोव्याच्या वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे. एलेना वानेवा (Elena Vaneeva) आणि एलेना कास्थानोवा (Elena Kasthanova) अशी ओळख पटलेल्या दोन्ही पीडित महिला रशियन नागरिक होत्या आणि त्या आरोपीच्या मैत्रिणी होत्या. एलेना कास्थानोवा, ही एक फायर डान्सर होती. तिने आरोपीकडून काही पैसे आणि एक फायर क्राउन (डान्सरकडून डोक्यावर आग ठेवण्यासाठी वापरला जाणारा रबराचा मुकुट) उसने घेतले होते. आरोपी स्वतः फायरवर्क कलाकार होता. दुसऱ्या महिलेनेही पैसे उधार घेतले होते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खून पूर्वनियोजित’ नव्हते. संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केलं होतं. अलेक्सी ‘अतिशय वेडसर’ होता आणि त्याला सहज राग येत असे. गुन्हे घडले त्यावेळी आरोपीने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचा पोलीस तपास करत आहेत.

बबल आर्टिस्ट असलेली एलेना वानेवा 10 जानेवारी रोजी गोव्यात आली होती, तर कस्तानोव्हा गेल्या वर्षी 25 डिसेंबरपासून राज्यात होती आणि अटक केलेल्या आरोपीसोबत राहत होती. हे दोघे देशाच्या विविध भागांमध्ये काम करत असत आणि वारंवार गोव्याला भेट देत असत, असं सूत्रांनी सांगितले.

अलेक्सेई लिओनोव्हकडे भारताचा दीर्घकालीन व्हिसा 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सेईकडे भारताचा दीर्घकालीन व्हिसा होता आणि तो कामासाठी देशातील अनेक शहरांमध्ये राहिला होता. तो वारंवार गोव्याला भेट देत असे आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो पुन्हा राज्यात परतला होता. अलेक्सेई छोटी-मोठी कामे करायचा आणि दिवसभर प्रवास करायचा, असेही सूत्रांनी सांगितले. आरोपीने जवळपास महिनाभरापासून कोणतेही काम केलेले नाही.

आरोपी सीरिअल किलर?

गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दावा केला आहे की त्याने आणखी पाच लोकांची हत्या केली आहे, ज्यांच्याशी त्याचे काही वाद होते आणि त्याने त्यांची नावेही सांगितली. परंतु जेव्हा पोलिसांनी पडताळणी केली, तेव्हा त्यांना आढळले की त्याने उल्लेख केलेले सर्व पाचही लोक जिवंत आहेत.

सूत्रांनी सांगितलं की, अलेक्सी मानसिक रुग्ण आहे आणि तो नेहमीच अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असतो. गोवा पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये 100 हून अधिक महिला आणि दोन पुरुषांचे फोटोही सापडले आहेत.

पोलिसांच्या मते, तो लोकांसोबत लवकर चिडचिड करायचा, पण त्यांच्याशी लवकर मैत्रीही करायचा. पूर्वी गोव्यात काही पुरुषांसोबत मारामारीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता, परंतु त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

आसामी महिलेच्या हत्येशी संबंध?

पोलिस गोव्यातील तिसऱ्या महिलेच्या हत्येशी अलेक्सीच्या संबंधाची चौकशी करत आहेत. आसामची रहिवासी असलेल्या मृदुस्मिता सैकिया ही 12 जानेवारी रोजी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती.

ती महिला आणि अलेक्सी एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते आणि अनेकदा एकत्र गोव्याला जायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैकिया मृतावस्थेत आढळण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ११ जानेवारी रोजी ते दोघे एकत्र होते. प्राथमिक तपासानुसार, त्या महिलेचा मृत्यू अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *