प्रेम, विश्वास आणि सुरक्षित भविष्याचं स्वप्न दाखवून एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात गंभीर आरोप होऊनही मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्यानं मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा संताप शिगेला पोहोचला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि प्रेमसंबंधांच्या नावाखाली होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छळ आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
एअर होस्टेस म्हणून कार्यरत
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 28 डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणी खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. पोलीस तपासात आणि कुटुंबीयांच्या तक्रारीतून समोर आलेल्या माहितीनुसार, 2020 सालापासून तिचे कौशिक प्रकाश पावशे याच्याशी प्रेमसंबंध होते. सुरुवातीला लग्नाचं वचन देऊन आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. मात्र, पुढील काळात हाच विश्वास तिच्यासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाचे कारण ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
