बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचं दिसून येत आहे. दररोज काही ना काही घटना समोर येत असल्यानं पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या अनुषंगाने अस्थिरता निर्माण झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलीची आरोपी धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत धीरज सांजुरे याने भेटण्याच्या उद्देशाने दि. 6 जानेवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचं आमिष दाखविले. त्यानंतर दि. 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी ती अल्पवयीन मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी आली असता सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आरोपी धीरज सांजुरे त्या मुलीला एका कारमधून घेऊन गेला. यापूर्वी एक महिन्याअगोदर हाच आरोपी तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला होता. कारने गेल्यानंतर एका निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला असल्याची घटना घडली.
आरोपीवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिली. या माहितीच्या आधारे पालकांनी तात्काळ पीडित मुलीसह केज पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, याप्रकरणी केज येथील पोलीस ठाण्यात आरोपी धिरज बाळासाहेब सांजुरे विरोधात गुर नं 09/2026 कलम 65 (1), 64 (2) (M), 87, 137 (2) bns. सह कलम 4,6 पोक्सो अंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भयंकर घटनेने बीड हादरलं
शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी दुपारी अंकुश नगर परिसरात एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
