प्रियकराला घराचे भाडे देण्यासाठी तीस हजार रुपयांची गरज असल्याने अल्पवयीन प्रेयसीनेच काकाच्या बंगल्यात दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रियकरासह दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक केली आहे. यश मोहन कुऱ्हाडे, (वय 20, रा. केसनंद), ऋषभ प्रदीप सिंह (वय 21, रा. चऱ्होली) आणि राज विवेक भैरामडगीकर (वय 20, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.
दिराच्या मुलीसोबत प्रेमसंबंध
कल्याणीनगरमध्ये तक्रारदाराचा बंगला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक दोन अनोळखी व्यक्ती चाकू, दोरी घेऊन बंगल्यात शिरले. चोरांना पाहून घरातील महिलांनी जोराने आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेले होते. येरवडा पोलिसांनी दोन तरुणांना अटक करून चौकशी केली असता या कटाचे बिंग फुटले. कुऱ्हाडे याचे तक्रारदाराच्या दिराच्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. घरभाडे देण्यासाठी 30 हजार रुपयांची गरज असल्याचे त्याने प्रेयसीला सांगितले होते. त्यावेळी प्रेयसीने काकाच्या घरी चोरीचा कट रचला.
दोन आरोपी इंजिनीअर
कुऱ्हाडे आणि त्याचे मित्र दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याने प्रेयसीने घराचे दार उघडून ठेवले होते. आरोपी घरात शिरताच महिलांनी आरडाओरडा केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला. कुऱ्हाडे बारावी नापास असून, ऋषभ सिंह मेकॅनिकल इंजिनिअर आणि भैरामडगीकर हा इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
‘दृश्यम’प्रमाणे मोबाईल ट्रकमध्ये फेकला
पुण्यातील विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खेड शिवापूर परिसरातून काल बुधवारी दुपारी मुलाचा मृतदेह मिळून आला. ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झालेल्या एका मुलीच्या मदतीने मुलाला खेड शिवापूरमध्ये बोलावल्याचे समोर आले आहे. ‘दृश्यम’प्रमाणे आरोपींनी खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृताचा मोबाइल ट्रकमध्ये फेकून दिला. मात्र, पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
