महापालिका निवडणूकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात विविध घडामोडींना उधाण आलं आहे. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीतही राजकीय पुढाकार आणि उमेदवारांच्या यादीत जोरदार हालचाली दिसत आहे. अनेक नव्या आणि अनुभवी उमेदवारांनी या निवडणुकीत भाग घेतला आहे. अलीकडेच ठाणे महापालिकेत विचित्रच प्रकार घडला. ठाणे महापालिका निवडणुकीत काहीवेळा अत्यंत धक्कादायक दृश्य पाहायला मिळतात. प्रभाग क्रमांक 26 (शैलेशनगर, मुंब्रा) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या संगीता दवणे या महिला उमेदवाराने एक वेगळाच पल्ला गाठला आहे.
नेमकं काय घडलं?
संगीत दवणे सोमवारी सकाळी घरात जेवण बनवत असताना अचानक प्रेशर कुकरचा स्फोट झाला आणि त्या गंभीरपणे जखमी झाल्या. या अपघातानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू झाले. पण, निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे संगीता दवणे यांनी जखमी असूनही रुग्णवाहिकेतून थेट प्रभाग समिती कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज भरला.
निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक असल्यामुळे त्यांनी रुग्णवाहिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट प्रभाग समिती कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकेत बसून त्या उमेदवारी अर्ज भरायला आल्या आणि स्वतःच अर्ज समितीत जमा केला. या धाडसी कामगिरीमुळे त्यांची उपस्थिती आणि उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत नुकतीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयाचं कौतुक करताना दिसले.
राजकीय पार्श्वभूमी
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत समजली जाते. यावेळी पक्षातील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातही प्रत्येकी उमेदवाराबद्दल निवडणूक रिंगण कठीण झाल्याचे चित्र आहे. मागील वेळच्या निवडणुकीत संगीता दवणे यांनी इतर पक्षाशी लढत दिली होती.
