दादर, वरळीत ठाकरे बंधूंविरुद्ध शिंदेचा मास्टर प्लॅन! मैदानात उतरवणार भावाला पराभूत करणारा ‘जायंट किलर’

मुंबईसहीत राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आजपासून सुरु झाली आहे. एकीकडे आजपासून 30 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असतानाच दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांनी अजून युती आणि आघाडीची घोषणा केलेली नाही. जागावाटपाचं नियोजन हे या रखडलेल्या घोषणांमधील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. जागावाटापाचं गुऱ्हाळ सुरु असतानाचा दुसरीकडे सर्वच पक्ष आपआपल्या स्तरावर निवडणुकीच्या प्रचारापूर्वीचं नियोजन करत आहे. असं असतानाच मुंबईतील मराठी मतांवर उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांचा डोळा असतानाच हाच मतदार आपल्या बाजूने वळवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केलं असून याच आखणीचा एक भाग म्हणून त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी एका अत्यंत खास व्यक्तीची निवड केल्याची माहिती समोर येत आहे.

भावाला पराभूत करणारा जायंट किलर शिंदेंनी निवडला

काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये आपल्याच धाकट्या भावाला पराभूत करणाऱ्या जायंट किलर नेत्याकडे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा दबदबा असलेल्या  वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादरसारख्या मराठीबहुल प्रभागांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि थेट ठाकरेंना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंची निवड केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे बंधूंचं टेन्शन वाढणार

मुंबई महानगर पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असून ते या भागातील प्रमुख स्टार प्रचारक असणार आहेत. वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या मराठीबहुल भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे. यामुळे नक्कीच ठाकरे बंधूंचं टेन्शन वाढणार आहे. लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार असून त्यात निलेश राणे स्टार प्रचारक असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबामधील राजकीय वाद सर्वश्रृत आहे. त्यामुळेच आता या प्रभागामध्ये खरोखरच निलेश राणेंना शिंदेंनी प्रचारासाठी मैदानात उतरवलं तर प्रचाराचा खरोखरच धुरळा उडणार असून ही निवडणूक अधिक रंगतदार होईल यात शंका नाही.

भावाचाच केला पराभव

मालवण आणि कणकवली या दोन्ही नगरपालिकांमध्ये निलेश राणे यांनी धाकटा भाऊ नितेश राणे यांना धक्का देत निवडणूक जिंकली. निलेश राणेंच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीने निर्णायक विजय मिळवला आहे. मालवण नगर परिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केला. दुसरीकडे कणकवलीत आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले असून, त्यांनी भाजपच्या समीर नलावडे यांना पराभूत केलं. हा निकाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *