नांदेडमध्ये नशेच्या औषधांची बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात विक्री होतं आहे. मेडिकल दुकानातून या नशेच्या गोळ्या विक्री होतं आहे. या माहितीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने नशेच्या औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरोधात कारवाई सुरु केली आहे. मेडिकल दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्या विकल्या जात होत्या. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत 13 मेडिकल दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसंच 32 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. नांदेड शहर हे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे बाहेरूनही अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.
शैक्षणिक हब असलेल्या नांदेड शहरात नशेच्या औषधांची विक्री
नांदेड शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं. राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी नांदेडमध्ये वास्तव्यास आहेत. काही मेडिकल स्टोअर्समार्फत नशेच्या औषधांची आणि गोळ्यांची सहज उपलब्धता होत असल्याची तक्रार काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी एका बैठकी दरम्यान पालकमंत्र्याकडे केली होती. त्यानंतर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यनी दिले होते.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं….
कारवाईच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील औषधी दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. नोव्हेंबर महिन्याअखेर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री तसंच औषध कायद्याच्या इतर तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 47 औषधी पेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसा देत लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं.
मिळालेलं स्पष्टीकरण समाधानकारक न आढळल्याने 32 औषधी पेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 12 औषधी पेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित 3 औषधी पेढ्यांविरोधात कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
