निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर गेल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक रद्द केल्याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. स्थगिती आणलेल्या जागांची निवडणूक रद्द करणे अयोग्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे.
“महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मात्र नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये राज्यातील जवळपास 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे याठिकाणी गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक 1966 मधील नियम 17(1) आणि राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेले सहपत्र आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेले सुधारित निर्देश यामधील समन्वयाचा अभाव राज्य निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावा असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे.
“ज्या ठिकाणी अपीलाचा निर्णय 26 नोव्हेंबर 2025 च्या नंतर लागला आहे, किंवा उमेदवार स्वतः शपथपत्र देत असेल, त्याठिकाणी सर्व बाबींचा विचार करून निवडणुका स्थगित न करता सुरु ठेवाव्यात, जेणेकरून राज्यातील सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा,” अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
कुठे संपूर्ण निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात, किती प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?
जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभाग
पुणे (९ जागा) : दौंड- प्रभाग ९अ (१ जागा), लोणावळा – ५ब, १०अ (२ जागा), तळेगाव : २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १० (६ जागा) सातारा (३ जागा): कराड प्रभाग १५ब (१ जागा), मलकापूर – ४अ, ८अ (२ जागा)
सांगली (१ जागा) : शिराळा – प्रभाग ४
सोलापूर (३ जागा) : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ (२ जागा), मोहोळ ३अ (१ जागा) यवतमाळ (६ जागा): दिग्रस प्रभाग २ब, ५ब, १०ब (३ जागा), पांढरकवडा ८ अ, ११ ब (२ जागा), वणी – १४ अ (१ जागा)
वाशिम (२ जागा): रिसोड – ५ब, १०अ
गडचिरोली (४ जागा): गडचिरोली- १ अ,
४ब, ११ ब (३ जागा), आरमोरी प्रभाग १० चंद्रपूर (४ जागा): गडचांदूर – प्रभाग ८ब (१ जागा), मूल- १०ब (१ जागा), बल्लारपूर – ९अ (१जागा), वरोरा ७ब (१ जागा)
