नवस पूर्ण करुन निघाले, एकाच कुटुंबातील तिघांसह चिमुकलीचाही मृत्यू, बाबा म्हणाले माझी मोक्षिता गेली आणि…

वडिलांची प्रकृती बरी व्हावी म्हणून स्वाती नवलकर यांनी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी त्या आई, वडिलांसह केतकावळे येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत तीन वर्षीय मोक्षिता रेड्डी हीदेखील गेली होती; तसेच गुरुवारी स्वाती नवलकर यांच्या किशोरवयीन मुलीचा वाढदिवस होता. मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी कुटुंबाने केली होती. आई घरी आल्यावर वाढदिवस साजरा होणार होता. मात्र, अपघातामुळे या मुलीने आई, आजोबा आणि आजीला गमावले.

नवले पुलाजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील विवाहित मुलगी, वडील आणि आईचा मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील या पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तेव्हा त्यांची स्वप्नंही बेचिराख झाली.

ट्रकने मागून धडक दिल्यानंतर कार दोन ट्रकच्या मधोमध अडकली. या अपघातामुळे वाहनांनी पेट घेतला. ही धडक आणि आगीची तीव्रता इतकी होती, की कारमधील पाच जणांना बाहेर पडता आले नाही. या अपघातात कार चालक धनंजय कोळी (वय ३०, रा. चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. जयसिंगपूर, कोल्हापूर), स्वाती संतोष नवलकर (३७), स्वाती यांचे वडील दत्तात्रय दाभाडे (५८), आई शांता दाभाडे (५४, सर्व रा. धायरी) आणि मोक्षिता रेड्डी (तीन वर्षे, रा, चिखली) या पाच जणांचा मृत्यू झाला. धनंजय कोळी आणि नवलकर- दाभाडे कुटुंबीय ओळखीचे होते. हे सर्व केतकावळे येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासात त्यांचा करूण अंत
झाला.

मोक्षिता रेड्डी हिचे वडील हेमकुमार रेड्डी या अपघातातून सावरलेले नाहीत. ‘स्वाती बहीण होती. आमच्या कुटुंबाचे जवळचे नाते होते. स्वाती आणि तिच्या आई-वडिलांबरोबर माझी तीन वर्षांची मुलगी बालाजीच्या दर्शनासाठी गेली होती. धनंजय कोळी हे नवलकर यांच्या परिचयाचे होते. या अपघातात तीन वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने सर्वस्व गमावले आहे,’ अशा शब्दांत रेड्डी यांनी अश्रूंना वाट करून दिली.

‘रस्त्यांवर फेकले गेलो’

प्रवासा दरम्यान मळमळ होते म्हणून गाडीत झोपले असतानाच अचानक अपघात झाला आणि आम्ही रस्त्यावर पडलो. लोकांचे आवाज येते होते, काही जणांच्या शरीरातून रक्त येते होते, तर काही जण रस्त्यांवर पडले होते, असे जुलेखा सय्यद यांनी सांगितले. सय्यद यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय सातारा येथे गेले होते. त्यांच्या कुटुंबातील १५ जण प्रवास करीत होते. कुटुंबातील काही जणांना गंभीर दुखापत झाल्याने नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जुलेखा आणि त्यांची मुलगी सायमा सय्यद यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. जुलेखा यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. सायमा सय्यद हिला पायाला दुखापत झाल्याची माहिती जुलेखा सय्यद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *