गुन्हेगारांचे धाबे दणाणले, भाईगिरी करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम, कल्याण पोलिसांचं कौतुक

दारूच्या नशेत दोघे कल्याणच्या स्टेशन परिसरात आले. खिशातून सिगारेट काढली. टपरी चालकाकडून माचिस मागितली. मात्र टपरी चालकाने माचिस देण्यास नकार दिला. या कारणावरुन संतप्त झालेल्या दोघा कथित भाईंनी कमरेला खोचलेला कोयता काढून दहशत माजवली. हातातील कोयता पाहून साऱ्यांची पळता भुई थोडी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. मात्र महात्मा फुले चौक पोलिसांनी शोध घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघा कथित भाईंना गचांडी पकडून गजाआड केले.

समाज माध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन तरूण दिसत आहेत. दोघांपैकी एक जण लोकांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तर दुसरा हातात कोयता घेऊन उभा आहे. आमच्या नादाला लागू नका, एक एकेकाला खल्लास करून टाकणार, अशा धमक्या देणाऱ्या या कथित भाईंचा कारनामा एका बहाद्दर जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपास कामाकरिता पथके तयार केली. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या त्या दोन्ही कथित भाईंना बेड्या ठोकून गजाआड केले. निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील राहणारे आहेत. या घटनेचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का? याचा चौकस तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे दारूच्या नशेत कल्याण पूर्वेतून पश्चिमेतील स्टेशन परिसरात आले. त्यांनी सिगारेट सोडण्याकरिता टपरी चालकाकडे माचिस मागितली. टपरीवाल्याने माचिस देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या दोघांनी कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. गुन्हेगार सर्रासपणे नको ते कृत्य करतात. त्यामुळे त्यांना पोलिसांचा भय नाही का? असादेखील प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, भाईगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांना पोलिसांनी योग्य धडा शिकवल्याने आता पोलिसांचं देखील कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *