मराठा समाजाला इतर मागास वर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक बुधवारी अंतरवाली सराटी येथून शहागड-पैठणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि गणपतीची पूजा-आरती केल्यानंतर जरांगे यांना महिलांनी ओवाळले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई सुरू झाली आहे. आता कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला असून काही समाजकंटकांनी जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अहिल्यानगर-कल्याण मार्गावर पोहोचल्यानंतर बुधवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान काही गाड्यांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक पिकअप आणि एका स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फुटल्या. तसंच यामध्ये एक आंदोलक जखमी झाल्याचं सांगितलं जात असून सदर जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर दगडफेक करणाऱ्या विकृत समाजकंटकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
