कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडले होते. कचराकुंडीजवळून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज नागरिकांच्या कानावर पडला. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एका गोणीत एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक असल्याचे आढळले.
त्यांनी त्वरेने खडकपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला तातडीने बालसंगोपन केंद्रात दाखल केले आणि हे बाळ तिथे कोणी ठेवले याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत.
तपासातून समोर आलेलं सत्य
सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. या बाळाला 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिला असल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित मुलगी आपल्या घरात एकटीच राहत होती. तिचे आई-वडील नसून, आजी-आजोबा मात्र गावी राहत होते.
ही मुलगी एकटी असल्याची संधी साधत परिसरातील 21 वर्षीय तरुणाने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले आणि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर या तरुणाने तिला नऊ महिन्यांपर्यंत घरातच डांबून ठेवले आणि बाहेर पडण्यास मज्जाव केला.
बाळ जन्मल्यानंतरचा अमानुष प्रकार
नऊ महिन्यांनंतर या तरुणानेच अल्पवयीन मुलीला घरातच प्रसूतीसाठी मदत केली. मात्र, बाळ जन्मताच त्याने त्या अर्भकाला गोणीत भरून कचराकुंडीत टाकून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता.
खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करत अखेर या 21 वर्षीय आरोपीला टिटवाळा परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेमुळे कल्याण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा केलेला गैरवापर आणि जन्मल्यानंतरच निरपराध अर्भकाला कचर्यात फेकण्याचा अमानुष प्रकार समाजाला हादरवून सोडणारा ठरला आहे.
