पुण्यातील दौंडमध्ये भीषण अपघात, दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक, दोन जणांचा मृत्यू ५ जखमी

पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील यवत परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशन हद्दीत दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मारुती भोसले (रा. बोरीभडक, ता. दौंड) हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्र. एम.एच. १२ व्ही. ५०१२) निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन चालवत होता. यावेळी त्याने वाहन नियमांचे उल्लंघन करत उरुळी कांचनकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला (क्र. एम.एच. १२ टी वाय ७९३१) जोरदार धडक दिली. या धडकेत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि गणेश दोरगे (वय २८, रा. यवत, ता. दौंड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी राकेश भोसले याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, तसेच मोटर वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांनी महामार्गावर गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *