कल्याणमध्ये अवयवदान नोंदणी केंद्र कार्यान्वित

कल्याणमध्ये अवयवदान नोंदणी केंद्र कार्यान्वित

कल्याणमधील इंडियन मेडिकल असोसिएशनने हिरानंदानी रुग्णालयाच्या सहकार्याने एक अवयवदान नोंदणी केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या अवयवांचे दान करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये अवयवदान करण्याची इच्छा असणाऱ्यांची संमतीपत्रे, त्याच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, तसेच इतर माहितीचा समावेश असेल. केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात अवयव प्रत्यारोपण विषयातील तज्ज्ञ डॉ. प्रवीण शिंगारे, तसेच हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे, ठाण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, अभिनेत्री शिल्पा तुळसकर व आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. अंजूम सईद उपस्थित होते.

अवयवदानाविषयी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेसाठी ‘आयएमए कल्याण’ माहिती संकलित करण्यामध्ये योगदान देईल. सध्याच्या उपलब्ध आकडेवारीवरून दरमहा सहा ते सात किडनी तर तीन ते चार यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. मात्र प्रत्यारोपणासाठी अवयव मिळण्याची वाट पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे व त्यांना अवयव मिळण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत अवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. अवयवदान केंद्रामध्ये नाव नोंदवण्यासाठी आतापर्यंत ३५० डॉक्टर्स, तसेच विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या ५०० लोकांनी आपली संमतीपत्रे दिली असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष तसेच विभागातील विविध रुग्णालयांशी संलग्न असणाऱ्या डॉ. अंजूम सईद यांनी दिली.

भारतातील अवयवदानाच्या सद्य:स्थितीविषयी माहिती देताना डॉ. सईद यांनी सांगितले की, दर १० लाख लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांचे प्रमाण अवघे ५० (०.०५ टक्के) आहे. दर दहा लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांचे प्रमाण एक टक्का झाले तरी   आपण देशातील मानवी अवयवांचा तुटवडा कमी करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *