नात्याला काळिमा फासणारी एक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घडली आहे. एका 27 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे तरुणाच्या सख्ख्या काकीनेच सुपारी देत पुतण्याची हत्या करण्याची सुपारी दिली होती. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाडा येथे 20 जुलै रोजी एका तरुणावर मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यानंतर मोबाईल फोन आणि स्कुटी जबरदस्तीने चोरी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आल्यानंतर मोठा खुलासा करण्यात आला. जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला घडवून आणला होता. यासाठी तरुणाच्या काकीनेच 1 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे समोर आले.
20 जुलै रोजी रात्री 8.30च्या सुमारास ऋषिकेश मनोरे हे त्यांचे दुकान बंद करुन घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले. मोबाइलवर बोलण्याच्या बहाण्याने एकाने त्यांचा मोबाईल घेतला तर दुसऱ्याने ऋषिकेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तर इतर दोघांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. ऋषिकेश यांना वाडा सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी ठाणे येथे दाखल करण्यात आले.
वाडा पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींवर नजर ठेवली. हे आरोपी दोन दिवसांपासून वाडा शहरात फिरत असल्याचे समोर आले. तपासादरम्यान ही घटना फक्त लूटमारीची नसून पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत नाशिकमधून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तिघांची चौकशी करताच त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ऋषिकेश मनोरे याची सख्खी काकू राधिका मनोरे हिनेच कौंटुबिक वादातून पुतण्याच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली असून सुपारी देणारी काकू सध्या फरार आहे. वाडा पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाची हत्या
जळगाव शहर हे आता गुन्हेगारीचे केंद्र म्हणून उदयास येऊ लागले आहे. दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले त्यानंतर एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची भर रस्त्यात हत्या केली. धीरज दत्ता हिवाळे असा 27 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे तर कल्पेश वसंत चौधरी हा यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी जोशी कॉलनीत घडली आहे.