बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी चक्रात बुडाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी धोकादायक दिशेने वाटचाल करत आहे. अपहरण, हत्या, सार्वजनिक हिंसा, राजकीय संरक्षण हे सर्व घटक येथे गंभीर होत चालले आहेत. राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेची भूमिका पाळण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तसे आरोप देखील केले जात आहेत. दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख प्रकरण सुरु असतानाचा बीडमध्ये मोठ्या प्रमाणीत गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल का केला? असा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारल्यामुळे याचा राग मनात धरून काही तरुणांनी एका तरुणाच्या हाताची बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी बीड पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून  एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

3 दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने कोयता आणि सत्तुरने धमकावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच तू व्हिडीओ इतरांना का दाखवत आहे. याचा जाब अनिसने शेख अलीमला विचारला. त्यानंतर संतापलेल्या अनिसने त्याला गाडीवर बसवून एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला मारहाण करत तरुणाची बोटे छाटली. अनिस हा या घटनेतील मुख्य आरोपी असून तो मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी या घटनेतील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर तीन आरोपी हे अद्याप फरार असून बीड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बीडमध्ये खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्याच असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीडमध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले असल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *