शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते. 21 जुलै च्या पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला. त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला.
नेमकं काय झालं?
63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. यामुळे त्यांना शनिवारी नांदेड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. पहिल्या दिवशी रुग्णावर आयसीयू विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला सर्जरी विभागात वॉर्ड नंबर 28 मध्ये दाखल केलं. रात्री झोपेत असताना रुग्णाच्या शरीरावर उंदरानं चावा घेतला. ही बाब रुग्ण आणि कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी उंदराला हाकललं. मात्र, तोपर्यंत रुग्णाच्या पायाला जखमा झाल्या होत्या, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेमुळं रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
कारवाईची मागणी
शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोनढारकर यांनी धारेवर धरले. या घटणेबाबत बैठक घेउन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोनढारकर म्हणाले.
रुग्णालयाने काय दिलं उत्तर?
उंदराना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले. शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची अभ्रू वेशीला टांगल्या गेली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे
