आधी शिंगावर घेतलं, मग छातीवर नाचली… गायीच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; नाशिकची घटना CCTV त कैद

चवताळलेल्या गायींनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यामुळे रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. हा सारा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून अनेकजण आजूबाजूला असतानाही त्यांना या वृद्धाला वाचवता आलं नाही. नक्की कुठे आणि काय घडलं जाणून घेऊयात…

मदतीला आलेला इसमही जखमी

मोकाट जनावरांमधील दोन गायींच्या भांडणानंतर चवताळलेल्या गायींनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यामुळे नाशिकच्या कळवण येथे रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव भालचंद्र रघुनाथ मालपुरे असे आहे. मृत भालचंद्र मालपुरे वाचविण्याच्या प्रयत्नात गायींनी हल्ला केल्यामुळे आबा मोरे नावाचा इसम जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की घडलं काय?

भालचंद्र रघुनाथ मालपुरे हे वृद्ध दुचाकीवर मागे बसून रस्त्याने जाताना खाली उतरले. मात्र खाली उतरल्या उतरल्या त्यांच्यावर दोन मोकाट गाईंनी हल्ला केला. या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटत पायाखाली तुडवले. लोक गायींना मालपुरेंपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते तरी गायी त्यांना पायाने आणि शिंगाने हल्ला करत होत्या. गंभीर जखमी मालपुरे यांना नागरिकांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला.

मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

एका चवताळलेल्या गाईने केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील जुना ओतूर रोडवरील कळवण मर्चेंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेजवळील श्री सायबर कॅफेसमोर सोमवारी सकाळी मोकाट जनावरांपैकी दोन गायींमध्ये भांडण चालू होते.  याबाबत कळवण पोलिस ठाण्यात योगेश रत्नाकर मालपुरे यांच्या तक्रारीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीही देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये मागील काही काळात घडलेली ही पहिलीच अशी विचित्र घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *