तेजस्वी घोसाळकरांना मुंबै जिल्हा बँक संचालकपद मिळताच हालचाली वाढल्या, ठाकरेंचा मोठा निर्णय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून होताना दिसत आहे. घोसाळकरांची दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आले होते. घोसाळकरांनी आपण ठाकरेसेनेसोबतच असल्याचं पुन्हा सांगितल्यानंतरही राजकीय वर्तुळात कुजबूज सुरुच होती.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई बँकेवर भाजपचे वर्चस्व असून बँकेने घेतलेला निर्णय पाहता घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती.

नाराजीच्या चर्चा

एकीकडे, तेजस्वी घोसाळकर शिवसेना उबाठामध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मागील वर्षभरापासून या पदासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र गेल्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घोसाळकर यांच्या नियुक्तीबद्दलचा निर्णय घेण्यात आला तेजस्विनी घोसाळकर मुंबईच्या पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर भागातील माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालकपदावर होते. त्यांची गेल्या वर्षी हत्या झाली. त्यानंतर अभिषेक यांची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे सद्भावना म्हणून तेजस्विनी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

घोसाळकरांची ठाकरेंशी भेट

तेजस्वी घोसाळकर या उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गेल्या मंगळवारी उबाठाचे उपनेते आणि तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आपण आणि आपल्या स्नुषा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तेजस्वी यांच्यावर शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचे घोसाळकर म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *