पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं

खामगाव-पंढरपूर महामार्गावर  अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी पुन्हा एकदा भीषण अपघाताची   घटना घडली असून, एका आलिशान गाडीचा 300 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना धारूर येथून परभणीकडे निघालेल्या गाडीतील वाहन चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. धारूर घाटात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट 300 फुट खोल दरीत कोसळली. या वाहनात भीमराव घायाळ आणि संदीप घायाळ हे दोघे प्रवासी होते.

दोघेही गंभीर जखमी, बीडला उपचारासाठी हलवले 

अपघातात दोघेही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघांनाही तातडीने स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धारूर घाटात सुरक्षेसाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हे वारंवार अपघात होत आहेत. तसेच या घाटात काही ठिकाणी कव्हरेज नसल्याने देखील अपघात झाल्यावर वैद्यकीय सेवा भेटण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जुन्या वर्सोवा पुलावर भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर आज सोमवारी (दि. 23) दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडून थेट खाडीत कोसळला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून टँकर संपूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.  हा टँकर वसईहून ठाण्याकडे निघाला होता. दरम्यान, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर टँकरने पुढे चाललेल्या लाकडांनी भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर गोंधळलेल्या टँकर चालकाने स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट पुलावरून खाली खाडीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. टँकर उचलण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, पाण्यात पूर्ण बुडालेला टँकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *