वर्गात शिक्षिका शिकवित असताना इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर वरून कोसळल्याचा धक्कादायक प्रकार नेरुळमधील महापालिकेच्या शाळेत घडला. नेरुळ सेक्टर ३० मधील भूखंड क्रमांक ८अ वर सुमारे १७.७५ कोटी खर्चुन नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेत हे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्गात शिकवत असलेली वर्गशिक्षिका सुदैवाने यातून थोडक्यात बचावली आहे. मात्र यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शालेय शैक्षणिक वर्ष १६ जून रोजी सुरू झाले. शाळा सुरू झाल्यापासून चौथ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी इयत्ता ६वी ‘क’ चा वर्ग सुरू असताना अचानक त्या वर्गातील स्लॅबचे मोठे दोन भाग खाली कोसळले. यावेळी वर्गात ३६ विद्यार्थी उपस्थित होते. वर्गशिक्षिकेच्या डोक्यावर ह्या स्लॅबचा काही भाग पडला. त्यांना डोक्यावर किरकोळ दुखापत झाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे विद्याथ्याँच्या आणि शिक्षकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून, त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य करण्यात आले असूनही या शाळेमध्ये अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शौचालयाबाहेर सूचनाफलक, कुठलेही चिन्ह लावलेले नाही.