कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सागर सुरेश करमळकर (वय 32) व सुषमा सागर करमळकर (वय 26) असं नवदांपत्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर त्यांच्या भावेश्वरी कॉलनी येथील घरामध्ये असताना त्यांचा फोन उचलला जात नव्हता. कालांतराने फोन स्विच ऑफ झाल्याने मित्र परिवाराने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गॅस गिझरचा गॅस लिकेज होऊन बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती. मोठा मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

‘फादर्स डे’लाच बाप लेकाचा दुर्दैवी अंत

दरम्यान, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रोहित सुधीर माने (वय 35) व त्याचा चार वर्षांचा मुलगा विहान माने या दोघांचा ‘फादर्स डे’लाच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात रोहितची पत्नी शमिका या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच रोहितचे आई,वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले. रोहित हे नावाजलेले क्रिकेटपटू होते. शालेय स्तरावरील अनेक स्पर्धा त्यांनी गजविल्या होत्या. सध्या ते पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीस असल्याने पत्नी शमिका व मुलगा विहान यांच्या समवेत चिंचवड येथे स्थायिक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *