पुण्यातील महावितरणाच भोंगळ कारभार

शहराच्या नाना पेठेतील डोके तालीम परिसरात काल सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या बेफिकीर कारभारामुळे एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेला असून, दुसरा एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

गणेश डांबे यांची ७ वर्षीय मुलगी सायली आणि शिळीमकर नावाचा मुलगा काल सायंकाळी सुमारे ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर खेळत होते. खेळता खेळता दोघांचे लक्ष विचलित झाले आणि सायलीचा हात चुकून महावितरणच्या उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला लागला. त्या खांबात वीजप्रवाह सुरू होता, हे लक्षात न आल्याने तिला जोरदार विद्युत धक्का बसला आणि ती जागीच मरण पावली. तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलालाही शॉक बसला असून, तो सध्या गंभीर जखमी आहे आणि त्याचा एक पाय निकामी झाला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे मुलाला आता आयुष्यभरासाठी अपंगत्त्व आले आहे. पुण्यातील महावितरणाच भोंगळ कारभार उघड झाला आहे.

ही घटना घडताना परिसरात काही रहिवासी उपस्थित होते. त्यांनी तत्काळ मदत केली, परंतु सायलीला वाचवता आले नाही. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, महावितरणच्या अजब-गजब कारभारावर टीका केली आहे. महावितरणाने आता तरी आपले डोळे उघडून ज्या ठिकाणी विद्युततारा उघड्यावर आहेत. त्यासोबत असे धोकादायक डीपी असतील तिथे माणसे पाठवून काम करून घ्यावे, नाहीतर हकनाक अनेक बळी जाऊ शकतात.

सायलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून, शासकीय पातळीवर किंवा समाज माध्यमातून मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. संपूर्ण परिसरात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून, सायलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *