वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा ताबा आता त्याची आजी आणि वैष्णवीची आई स्वाती कस्पटे (Swati Kaspate) यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा बाल संरक्षण समितीने हा निर्णय घेतला आहे. जनक हगवणे असं त्या मुलाचं नाव असून यापुढे त्याच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी ही स्वाती कस्पटे यांची असेल.
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्याच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी वैष्णवीची आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती (Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानतंर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरून वाद झाला होता. करिश्मा हगवणे हिचा जवळचा मित्र निलेश चव्हाणने त्या बाळाचा ताबा घेतला होता. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी त्या बाळाचा ताबा मागितल्यानंतर त्यांना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला. त्यानतंर निलेश चव्हाणची अनेक काळी कृ्त्ये समोर आली. त्याच्या बायकोनेच त्याच्यावर अनेक आरोप केले.
घडलेल्या या प्रकारानंतर निलेश चव्हाण फरार झाला आणि त्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबीयांनी घेतला. या बाळाचे पालकत्व आपल्याला मिळावे अशी मागणी कस्पटे कुटुंबीयांनी जिल्हा बाल संरक्षण समितीकडे केला. त्यानंतर स्वाती कस्पटे यांच्याकडे या बाळाचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पाळ सीमेवरून निलेशला अटक करण्यात आली होती. याला आता शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिला.
नेपाळहून विमानाने निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलिस शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता पुण्यात दाखल झाले होते. गेली दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला. तीन राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहचल्याची माहिती समोर आली. तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला होता. तिथेच त्याला अटक झाली.