नागपूर कारागृहातील कैदी पळाला

नागपूर कारागृहातील कैदी पळाला

कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी पसार झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. शासकीय मेडिकल कॉलेजमधून या कैद्याने पळ काढल्याचे समजते. सहा महिन्यांपूर्वीच्या ‘जेल ब्रेक’ची घटना ताजी असतानाच बुधवारच्या या घटनेने तुरुंग प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेहबूब खान या कैद्याला उपचारासाठी दाखल केले असता त्याने पोलिसांच्या हातावर दिली तुरी देत तेथून पळ काढला. नागपूर पोलीस या फरार कैद्याचा शोध घेत आहेत.

जून महिन्यात खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला पुरुषोत्तम भोयर (४५) हा कैदी पसार झाला होता. तर यापूर्वी याच कारागृहातून एप्रिल महिन्यात कुख्यात पाच आरोपी पळून गेल्यामुळे कारागृह प्रशासनाची नाचक्‍की झाली होती. तरीही कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्याने येथून कैदी वारंवार पसार होत आहेत.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात कैदी बिसेनसिंग उईके (३५), मोहम्मद शोएब (मानकापूर), सत्येंद्र गुप्ता (२४), प्रेम खत्री (रा. नेपाळ) आणि आकाश ठाकूर (२२) हे बॅरेकचे गज कापून पळून गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणारे कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले. त्यांना त्यापूर्वीही निलंबित करण्यात आले होते. मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आणि सिमकार्डही सापडले आहेत. मात्र आजमितीस कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *