पोलिसाने लाच मागितल्याने आत्महत्या

वडिलोपार्जित जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनीच ५० हजार रुपयांची लाच मागितल्याने एका शेतक-याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली आहे. संभाजी वाघमोडे असे त्याचे नाव असून तो लातूरमधील नागेशवाडी गावचा रहिवासी आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत संभाजीने चाकूर पोलिसांनी लाच मागितल्याचे लिहून ठेवले आहे. इतके पैसे देणे शक्य नसल्यानेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.

संभाजी व त्याच्या भाऊ यांच्यात जमीन वाटणीवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण पोलिसात गेले. पोलिस कर्मचारी हारणे यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी संभाजीकडे ५० हजार रुपये मागितले. मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने निराश झालेल्या संभाजीने तशी चिठ्ठी लिहून गळफास लावत आत्महत्या केली.

chakur police latur suicideदरम्यान, पोलिसाचे नाव स्पष्ट लिहीलेले असतानाही पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचे नाव नोंदवण्यास नकार दिल्याने संभाजीच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

अखेर रात्री एक वाजता पोलिस कर्मचारी हारणे आणि अन्य तीन जणांवर चाकूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *