एका मजुराच्या बायकोमुळे मुंबई एअरपोर्टवरच्या अख्ख्या यंत्रणेला Alert; अखेर…

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही सुरक्षेत वाढ करण्यात आलेली असतानाच मंगळवारी मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर यंत्रणांची एकच धावपळ झाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. हा फोन आल्यानंतर यंत्रणा तातडीने कामाला लागल्या.

अंधेरी परिसरातून ताब्यात

यंत्रणांनी विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा प्रकार सापडला नाही. याप्रकरणी एका संशयिताला अंधेरी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.  नोटीस देऊन या व्यक्तीला पोलिसांकडून सोडून देण्यात आले.

धमकी देताना काय सांगितलेलं?

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने दुपारी 2 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली. या फोननंतर यंत्रणांनी सर्वत्र तपासणी केली असता त्यांना संबंधित विमानामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीचा फोन डिटेल्सच्या माध्यमातून शोध घेतला असता तो साकीनाका पोलीस ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना समजले.

तांत्रिक माहितीच्या आधारे घेतला शोध

तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक फोन आल्यानंतर काही वेळात साकीनाका येथे रवाना झाले. पण त्या व्यक्तीचा मोबाइल बंद असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी तंत्रिक मदत घेत तपास केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सीम कार्डसंदर्भातील माहितीच्या आधारे संशयित व्यक्तीचे छायाचित्र व नाव मिळविले. त्या माहितीच्या आधारे पोलीस एमआयडीसी पथकाने अंधेरी परिसरातील कपड्यांच्या छोट्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुराला ताब्यात घेतलं. संशयिताची ओळख मनजीत कुमार गौतम अशी पटली. त्याची चौकशी करून आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं.

पत्नीसोबतच्या वादातून आलेल्या नैराश्यातून त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीमध्ये समोर आलं. या कापडवाल्याच्या पत्नीनं त्याच्यासोबत वाद घातल्यामुळे मुंबई विमानतळावरील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असेच या प्रकरणामधून दिसून आलं. मागील काही महिन्यांमध्ये मुंबई विमानतळावर अशा प्रकारच्या कॉलचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *