ठाणे शहरात लवकरच मेट्रो धावणार आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गावर गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळं ठाणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रो 9 मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव मार्गिकेच्या चाचण्या पार पडल्या. त्यानंतर लकरच मेट्रो 4 मार्गावरीलही मेट्रो चाचण्या पार पडणार आहेत.
वडाळा ते ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली-गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या 10.5 किमी मार्गिकेवरील चाचणीला ऑगस्टमध्ये सुरूवात होणार आहे. यशस्वीरित्या चाचण्या पार पडल्यानंतर ही मार्गिका डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळं लवकरच प्रवाशांचा मेट्रो प्रवास सुरू होणार आहे.
मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानकं असणार आहेत. तीन टप्प्यात ही मेट्रो विभागली गेली आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंतचा विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. तर कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे. तर, 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027मध्ये वडाळा हा शेवटचा टप्पा सेवेत येण्याची शक्यता आहे. कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा 4A मार्गाचा विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून यावर्षाच्या शेवटी तो सेवेत येण्याची शक्यता आहे.
मेट्रो 4′ आणि ‘मेट्रो-4 अ’ मार्गावरील स्थानकं
1. भक्तीपार्क मेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली