एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये राजस्थानच्या पश्चिम भागापासून ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळाला. तर, महाराष्ट्रातही हीच स्थिती दिसून आली. याच वाढत्या उष्णतेमुळं मे महिन्याच्या सुरुवातीलाच देशाच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. अगदी दिल्लीपासून थेट महाराष्ट्रापर्यंत पावसानं नागरिकांची भंबेरी उडवली. पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मध्य क्षेत्रामध्ये ही स्थिती कायम राहणार असून या भागांना वादळी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील काही भाग मात्र यास अपवाद ठरणार असून, इथं मात्र तापमानाचा आकडा 40 अंशांपर्यंत पोहोचेल असाही इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. मुंबईत चित्र वेगळं नाही. मागील 48 तासांमध्ये मुंबई शहराला या अवेळी पावसानं झोडपलं. मात्र आता हा पाऊस काहीशी उसंत घेणार असून, शहरातील आकाश पुन्हा निरभ्र होणार आहे. दुपारनंतर दिवस मावळतीला जात असताना आकाश पुन्हा अंशत: ढगाळ होईल, मात्र तूर्तास कुठेही पावसाचा अंदाज नाही.
तुम्हीही या पावसाला मान्सून समजताय?
मे महिन्यात झालेल्या या पावसानंतर अनेकांनी त्याला मान्सून संबोधण्यास सुरुवात केली. मात्र हा मान्सून नसून, वाढलेल्या उष्णतेमुळं बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून सुरू झालेला पाऊस असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. गुजरातपासून अरबी समुद्रापर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेले चक्राकार वारे यांमुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
राज्याच्या कोकण पट्ट्यातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तर तिथं उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही वादळी पावसानं हजेरी लावण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यानच्या काळात कमाल तापमानात चढ-उतार अपेक्षित असल्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण असमान
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यापासून मान्सूनपूर्व हवामान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्यपूर्ण बदल दिसून येतील. ज्यामुळं देशाच्या पूर्व भागासह बहुतांश बेटांवर हवामानात झालेले बदल पाहायला मिळतील. थोडक्यात मे महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये उकाडा वाढलेला जाणवू शकतो.
देश स्तरावर पुढील 24 तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास अंदमान आणि निकोबार बेट समुहामध्ये हलक्या पावसाची शक्यता असून, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिमी हिमालय क्षेत्र, गुजरात, दक्षिण राजस्थान, तामिळनाडू, रायलसीमा या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असून पर्वतीय भागांमध्ये मात्र हवामान बिघडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.
