प्रवास अर्ध्या तासात पूर्ण होणार, महत्त्वकांक्षी मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार, किती असेल तिकीट, वाचा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा 2 अ शुक्रवारी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. आजपासून मेट्रो-3 चा टप्पा सुरू होणार आहे. कशी आहे ही मेट्रो मार्गिका जाणून घेऊयात.

आरे ते वरळीपर्यंत आता प्रवाशांना थेट भुयारी मार्गे प्रवास करता येणार आहे. मात्र आरे ते कफ परेड असा थेट भुयारी मेट्रो प्रवासासाठी मात्र मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मेट्रो 3 मार्गिकाही 33.5 किमी इतकी आहे. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024मध्ये सुरू झाला होता. या मार्गिकेवरुन भुयारी मेट्रो प्रवासदेखील सुरू झाला आहे. आता आरे ते आचार्य अत्रे चौक असा थेट प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बीकेसी ते सिद्धिविनायक स्थानकापर्यंत मुख्यमंत्री स्वतः मेट्रोने प्रवास करणार आहेत.

बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. मेट्रोमुळं आरे ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंतचा प्रवास 34 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तर, आरे ते वरळी या प्रवासासाठी 36 मिनिटांचा वेळ लागणार आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक 7 मिनिटांला एक मेट्रो धावेल तर इतर वेळी प्रत्येक 10 मिनिटाला एक मेट्रो धावणार आहे. मेट्रो 3 मार्गिकेला मेट्रो 1,2,6 आणि 9 जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावरील चर्चेगट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबत जोडली जाणार आहे. तसंच, मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे. आरे कॉलनी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या संपूर्ण मार्गाचे एकेरी भाडे 60 रुपये असणार आहे. अंतरानुसार, तिकीटाची किंमत ठरवण्यात येणार आहे.

मेट्रो-3 वर अशी असतील स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *