मुंबईमधील महागड्या ठिकाणी घरं किंवा बंगले खरेदी करणाऱ्या कुटुंबामध्ये काही ठरलेली नावं असतात. आता यामध्ये उदय कोटक यांच्या माध्यमातून नव्या नावाची भर पडली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापक असलेल्या उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईमधील वरळी येथील उच्चभ्रू वस्तीमधील एक अख्खी इमारतच विकत घेतली आहे. या इमारतीमध्ये 22 फ्लॅट्स असून या इमारतीचा सौदा तब्बल 400 कोटी रुपयांना झाला आहे. शिव सागर नावाच्या इमारतीमधील 10 सी-फेसिंग घरांसाठी कोटक कुटुंबाने नुकतेच तब्बल 200 कोटी रुपये मोजले आहेत. या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रांनुसार, कोटक कुटुंबाने खरेदी केलेल्या या फ्लॅट्सपैकी एकाचा दर तब्बल 2.89 लाख रुपये प्रती स्वेअरफूट इतका आहे.
एकूण 22 फ्लॅट्स अन् किंमत 400 कोटी+
याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये कोटक कुटुंबाने याच इमारतीमध्ये 202 कोटी रुपयांना 12 फ्लॅट्स खरेदी केले होते. आता कोटक कुटुंबाकडे या इमारतीमधील एकूण 22 फ्लॅट्स असून त्यांची एकूण किंमत 400 कोटींहून अधिक आहे. या व्यवहाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका कुटुंबाने अशा ठिकाणी संपूर्ण इमारत विकत घेतल्याचा प्रकार मुंबईतील रिअर इस्टेट क्षेत्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. स्थानिक ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये संपूर्ण सोसायटीच विकत घेण्याचा प्रकार फार दुर्मिळ आहे.
…म्हणून कोटक कुटुंबाने विकत घेतली इमारत
2024 मध्ये रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या बंगल्यासमोरच्या इमरतीचा पुनर्विकास होऊन समुद्राचा व्ह्यू जाऊ नये या उद्देशाने मलबार हील येथील घरासमोरील संपूर्ण इमारतच विकत घेतली होती. मात्र कोटक कुटुंबाने केलेली खरेदी ही त्यांच्या सध्याच्या घराचा विस्तार करण्याच्या दृष्टीने असल्याचा अंदाज रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांनी बांधला आहे. आपल्या आताच्या घराचा विस्तार करण्यासाठी हा प्लॉट कोटक कुटुंबाने ताब्यात घेतला असावा असं सांगितलं जात आहे.
…म्हणून महागड्या प्रॉपर्टी विकत घेतात अती श्रीमंत लोक
विकी अरोरा या रिअल इस्टेट कन्सल्टंटने दिलेल्या माहितीनुसार, वरळीसारख्या भागांमध्ये श्रीमंत किंवा अती श्रीमंत व्यक्ती त्याच्या घरांच्या आजूबाजूला नव्या इमारती उभ्या राहू नयेत म्हणून त्या विकत घेतात असं पाहायला मिळतं. त्यांचं खासगी आयुष्य, घरातून दिसणारा समुद्र, मानसिक शांतता या साऱ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महागड्या प्रॉपर्टीज घेतल्या जातात.
385 कोटींना विकत घेतला आलिशान बंगला
उदय कोटक यांच्या कुटुंबाने फ्लॅट्स घेतलेली शिव सागर इमारत ही चंपागणी हाऊसच्या बाजूला आहे. 2018 मध्ये चंपागणी हाऊसही 385 कोटींना विकत घेण्यात आलं आहे. ‘मिंट’ने 2018 साली दिलेल्या वृत्तानुसार, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने हा वरळी सी फेसवरील हा बंगला रंजीत चौघुले यांच्याकडून विकत घेतला होता. इंडेज व्हिंटर्स नावाच्या कंपनीमध्ये अधिकारी असलेल्या रंजीत यांच्याकडून हा बंगला कोटक कुटुंबाने 385 कोटींना विकत घेतलेला.
13 वेगवेगळे व्यवहार
‘झॅपकी डॉट कॉम’ने संपत्तीसंदर्भातील कागदपत्रानुसार, 30 जानेवारी 2025, 25 फेब्रुवारी 2025 आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी एकूण 13 वेगवेगळे व्यवहार नोंदवण्यात आले आहेत. या 13 फ्लॅट्सचा एकूण एरिया 173 स्वेअर फूट, 1396 स्वेअर फूट असे असून एकूण एरिया 7418 स्वेअर फुटांचा आहे.
10 फ्लॅट्सची किंमत 188 कोटी
‘इंडेक्स टॅप डॉट कॉम’ने कागदपत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार 10 फ्लॅट्सची किंमत 188 कोटी रुपये इतकी आहे. ही घरं 444 स्वेअर फुटांपासून 2200 स्वेअर फूट एरिया असणारी आहेत. या घरांच्या विक्रीची नोंदणी 5 मार्च 2025 आणि 21 एप्रिल 2025 रोजी झाली आहे.
