मुरुड जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ या निळसर रंगाच्या आकर्षक परंतु संवेदनशील समुद्री जीवामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली, तरी या जीवाशी संपर्क साधणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड मधील प्राणिशास्त्र विभागामार्फत या ‘Blue Button Jellyfish’ विषयी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.
पाऊस येण्याआधी हे निळ्या फुलाप्रमाणे दिसणारे समुद्री जीव किनाऱ्यावर येतात. पावसाची पूर्व सुचना देणाऱ्या नैसर्गिक लक्षणांमधील ही एक सुचना असल्याचं कोळी बांधव सांगतात. दरवर्षी पावसाळ्याआधी किनारपट्टीवर Blue Button Jellyfish आणि Blue Bottol Jellyfish आढळतात. ज्याला कोळी बांधव समुद्रात फुल पडलं असं म्हणतात. पावसाळ्याच्या आधी समुद्राकडून जमिनीकडे वेगाने वारे वाहतात. तेव्हा खोलात राहणारे हे जलचर प्राणी किनाऱ्यावर येतात. जेली फिशच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. पण, इतर प्रजातींपेक्षा बॉटल जेली फिश अधिक घातक असते तर बटन जेली फिश तितकी त्रासदायक ठरत नाही.
वसंत ऋुतूच्या सुरूवातीला वावर
ब्लू बॉटल जेली फिश वसंत ऋुतूच्या मध्य किंवा उत्तरार्धात आढळतात. तर, बटन जेली फिश सुरुवातीला आढळतात. ब्लू बटन जेलीफिश चावल्यास तितकी भीती नाही वा त्याचा अधिक परिणाम होत नाही. पण, जर कोणाला ॲलर्जी असेल तर त्याला थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे, सध्या पर्यटकांनी खबरदारी म्हणून समुद्र किनाऱ्यापासून थोडं दूरच राहावं, असाही सल्ला अभ्यासक देतात.
‘Blue Bottol Jellyfish’ ने डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून गाठ येते आणि असह्य वेदनाही होतात.
स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज, सूज, जळजळ आणि चट्टे निर्माण होतात.
