NIA च्या हाती सबळ पुरावे! पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच; एका आदेशानंतर लपवलेला शस्त्रसाठा

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी एक भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि संपूर्ण जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला गेला. 26 निष्पापांचा बळी गेलेल्या या हल्ल्याचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती घेतल्यानंतर आता या तपासातून प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये पाकिस्ताननंच या हल्ल्याचा कट रचल्याचे सबळ पुरावे समोर आले आहेत.

एनआयएच्या प्रारंभिक अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार पहलगाममधील हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयसह पाकिस्तानी सैन्यदलाच्या प्रयत्नांतून घडवण्यात आला. हल्ल्याचा कट पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात आयएसआयच्या नेतृत्त्वाअंतर्गत रचण्यात आला आणि हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील हँडलर्च्या संपर्कात होते. पाकिस्तानातूनच त्यांना आदेश आणि आर्थिक मदत पुरवली जात होती.

दहशतवाद्यांची ओळख पटली 

एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली असून, ते पीओकेमधूनच आल्याचं स्पष्ट झालं. हाशिम मूसा, तल्हा भाई अशी त्यांची नावं असून ते पाकिस्तानचेच रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. काश्मीरमध्ये राहणाऱ्या आदिल ठोकर यानं लष्करच्या या दहशतवाद्यांची मदत केली असल्याचं तपासातून उघड झालं.

पहलगाम हल्ल्यासंदर्भातील संपूर्ण तपास प्रक्रियेत आतापर्यंत 150 हून अधिकजणांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर या संपूर्ण प्रक्रियेत 2500 हून अधिकजणांची प्राथमिक चौकशी झाली आहे. शिवाय आवश्यकता भासेल त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. एनआयएच्या तपास करणाऱ्या चमूनं बैसरन खोऱ्याचं 3डी मॅपिंग करत तिथं घटनाक्रमाचं प्रात्यक्षिकही केलं. यातून तिथं दहशतवाद्यांनी शस्त्रसाठा नेमका कुठं लपवला होता हे स्पष्ट झालं.

या भागातून निकामी काडतुसं मिळाली असून पुढील तपासणीसाठी ती Forensic Science Lab मध्ये पाठवण्यात आली आहेत. एनआयएकडून तयार करण्यात आलेला हा अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवण्यात येणार असून त्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधा कारवाई करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

एनआयए, दोन एफएसएल पथकं, रॉची एक टीम आणि जम्मू-कश्मीरमधील सर्व गुप्तचर यंत्रणा सध्या पहलगाममध्ये तळ ठोकून आहेत.  शिवाय 15 ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) तपास यंत्रणांच्या रडारवर असून, यापैकी काहींना अटकही करण्यात आली आहे. ही संपूर्ण मोहीम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *