मराठी शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात कंठशोष होत असतानाच मुंबईच्या मराठीबहुल दादर भागातील एक जुनी मराठी शाळा नव्या विद्यार्थ्यांअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या (आयईएस) नाबर गुरूजी विद्यालयाच्या दहावी इयत्तेतील ३५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी नववी आणि दहावी मिळून जेमतेम १७ विद्यार्थी उरले आहेत. मराठी अस्मितेचे नगारे वाजवणाऱ्या शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या बालेकिल्ल्यातच जुनी मराठी शाळा अडचणीत सापडली आहे.
दादरमध्ये १९४०च्या दशकापासून विद्यादानाचे कार्य करणाऱ्या नाबर गुरूजी विद्यालयाला यशस्वी विद्यार्थ्यांची परंपरा आहे. गेल्या ८५ वर्षांत या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज समाजातील विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. दादरमधील जुन्या आणि दर्जेदार मराठी शाळांपैकी एक अशी ओळख असलेली इंडियन एज्युकेशन सोसायटीची नाबर गुरूजी विद्यालय ही शाळा १ मेपासून बंद होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांमध्ये प्रसृत होत आहेत. याबाबत शहानिशा केली असता, इंडियन एज्युकेशन सोसायटीने ही शाळा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला नसल्याचे संस्थेच्या सतीश नायक यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही ही शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मराठी माध्यमाच्या या शाळेतील विद्यार्थीसंख्या प्रचंड रोडावली आहे’, असे त्यांनी सांगितले.
