पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं सारा देश हादरला. निसर्गाच्या कुशीत दडलेल्या पर्यटनस्थळी गेलेल्या 26 निष्पापांना तिथंच प्राण गमवावे लागले आणि कट्टरपंथीयांच्या या दहशतीपुढं पुन्हा माणुसकी ओशाळली. धर्म विचारून हल्ला करणाऱ्या या भ्याड दहशतवाद्यांनी ज्यांचा बळी घेतला, त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही आपली माणसं गमावल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवता येत नाहीये. कानपूरमधील व्यावसायिक शुभम द्विवेदीच्या पत्नीचाही यात समावेश आहे.
ऐशान्याच्या समोरच तिच्या पतीवर, शुभमवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आणि तिथूनच त्यांनी गोळीबाराचं रक्तरंजित सत्र सुरू केलं. शुभमचं पार्थिव ज्यावेळी त्याच्या मूळ गावी आलं तेव्हा तिथं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ओक्साबोक्शी रडत होती, पत्नी ऐशान्या तर स्वत:च्या पायावर उभीसुद्धा राहू शकत नव्हती.
कैक तास ती पतीच्याच पार्थिवापाशी बसून त्याकडे एकटक पाहत होती. भेदरलेली आणि शून्यात गेलेली तिची नजर असंख्य प्रश्नांसह त्याच्यावरच खिळली होती. हे जे काही घडलं ते सत्य नाहीये, असंच ती नकळत स्वत:ला समजवत होती. तितक्यातच अचानक ती तिथून उठून थेट घरातील एका खोली आली आणि अंगावर शुभमच्या आवडीचं शर्ट घालून ती बाहेर आली. पार्थिवापाशी आल्यानंतर त्याच शर्टात तोंड दाबून ती आक्रोश करू लागली, ओक्साबोक्शी रडू लागली. आर्त हाका मारू लागली, इतक्या की तिच्या एका तरी हाकेला शुभम प्रतिसाद देईल.
‘तो आला आणि विचारलं हिंदू की मुस्लीम?’
शुभमच्याच पार्थिवाकडे पाहताना तिनं तिनं थरथरत्या आवाजात आपबिती सांगण्यास सुरुवात केली, ‘आम्ही पहलगामच्या वरच्या भागात गेलो. तिथे आम्हाला घोड्यावर बसवून नेलं होतं. नुकतंच वर पोहोचलो आणि तेव्हा शुभमने मॅगी ऑर्डर केली होती. आम्ही ती खाणार होतो. बाबा वॉशरूमला गेले होते, माझी बहीण थोडी दूर बसली होती. तेवढ्यात एक माणूस आला आणि गोळी बाजूला ठेवून विचारलं, की तू हिंदू आहेस की मुस्लीम, जर तू मुस्लिम आहेस तर आधी कलमा म्हण…, आम्हाला समजलंच नाही. शुभम हसला आणि म्हणाला काय झालं…? त्यावर त्यानं पुन्हा विचारलं की हिंदू आहे की मुस्लीम? यावर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही हिंदू आहोत. हे बोलताच त्यानं शुभमवर गोळ्या झाडल्या’.
‘पहिला हल्ला त्याच्यावरच केला… त्यांनी का मारलं?’ असा कोणाकडेही उत्तर नसणारा प्रश्न तिनं पुन्हापुन्हा विचारला आणि तिथं असणाऱ्या प्रत्येकाच्याच भावनांचा बांध फुटला. शुभमच्या पार्थिवापासून क्षणभरही दूर न होता ऐशान्या तिथंच थांबून राहिली आणि त्याच्या अंत्यविधीसाठी पार्थिव निघताच तिनं जीवाच्या आकांतानं आक्रोश करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ऐशान्याची हतबलता साऱ्या देशानं पाहिली आणि तिला पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले.
