गृहनिर्माण सोसायट्या स्वत: पुनर्विकास करु शकणार आहेत. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाने आज निर्गमित केला.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील अडचणी सोडविण्यासाठी मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज योजनेचं एक नवं मॉडेल समोर आणलं, बँकेने या योजनेचा प्रचार आणि प्रसारही मोठ्याप्रमाणावर केला. आतापर्यंत मुंबई बँकेने 7 स्वयंपुनर्विकास प्रकल्प पूर्ण केले असून 15 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
यापूर्वी स्वयंपुनर्विकासासाठी शासनाने मुंबई बँकेला नोडल एजन्सी म्हणूनही नियुक्त केले आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या चारकोप येथील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटप कार्यक्रमात प्रविण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकासातील अडचणी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडल्या होत्या. याच कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा केली होती. आज या समितीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मुंबई महानगरात उड्डाणपुलांची कामे प्रगतिपथावर
मुंबई महानगरात उड्डाणपुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळ्यापूर्वी पुलांच्या कामांना गती द्यावी. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून सुयोग्य नियोजन करावे. दिलेल्या मुदतीत पुलांची कामे पूर्ण होतील, यासाठी दक्षता बाळगावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत बेलासिस पूल, 10 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल आणि 31 मे 2026 पर्यंत शीव (सायन) उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले झाले पाहिजेत, अशी कालमर्यादा देखील बांगर यांनी निश्चित केली
