यंदा उसाचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. या हंगामात एकूण २०० कारखाने सुरू झाले होते, त्यापैकी १९९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील ‘विघ्नहर’ सहकारी साखर कारखाना सुरू आहे, तोही आठ दिवसांत बंद होईल. दरम्यान, बुधवारअखेर ८० लाख टन निव्वळ साखर उत्पादन झाले आहे. उपपदार्थ वगळता निव्वळ साखर उतारा ९.४८ मिळाला आहे.
राज्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरुवातीपासून विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे एक महिना उशिराने, १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला. तरीही कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवला. उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला आहे. यंदाच्या हंगामात ९९ सहकारी आणि १०१ खासगी, असे २०० कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी बुधवारअखेर सुमारे ८५२ लाख टन उसाचे गाळप करून ८० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.

