आधी मैत्री नंतर लग्नाचं वचन, पण आयपीएस अधिकाऱ्याकडूनच अत्याचार; महिला डॉक्टरचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात सध्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला एमबीबीएस शिक्षण घेत असताना २०२२ साली इन्स्टाग्रामवरून तिची ओळख दर्शन दुगड यांच्याशी झाली. ओळखीतून मैत्री आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. दर्शन दुगड यांनी लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वासही संपादन केला. नागपूर तसेच केरळमध्ये जात महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु आयपीएस सेवेत निवड झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्यास नकार दिला आहे.

महिलेने आरोप केला की, दोन वर्षांच्या कालावधीत आरोपीने वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्नाला नकार देत जातीयवाचक शिवीगाळ व मारहाण केली. तसेच आरोपीच्या मावस बहिणीनेही शिवीगाळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे. या प्रकारामुळे ती नैराश्यात गेल्याचेही तिने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *