मुंबईत सध्या उकाडा अतिशय तीव्र झाला असून, घामाच्या धारांनी नागरिक असह्य झाले आहेत. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती असताना मे आणि जून महिन्यापर्यंत शहरातील उकाडा आणखी किती तीव्र होणार, याचीच भीती नागरिकांना आणि प्रशासनालाही सतावू लागली आहे. हीच भीती असताना आता राज्याच्या मुंबईसह आणखीही किनारपट्टी भागांवर घोंगावणाऱ्या संकटाची पूर्वसुचना पालिकेच्या वतीनं जारी करण्यात आली आहे.
मुंबईवर अथांग समुद्रामुळं ओढावणार संकट?
यंदाच्या वर्षीचा पावसाळा अधिक दमदार होणार असून राज्यासह मुंबई शहरातील समुद्राला 18 दिवस मोठं उधाण येणार आहे असा इशारा आतापासूनच जारी करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांत समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळं संभाव्य धोका पाहता मुंबईकरांनी खबरदारी म्हणून समुद्रकिनारे, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया इथं गर्दी न करता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन पालिकेच्या आपत्कालीन विभागानं केलं आहे.
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला उधाण येतं आणि त्यावेळी उसळणाऱ्या उंचच उंच लाटांमुळे चौपाट्यांवर फिरायला येणाऱ्यांच्या जिवाला धोका उदभवतो. याच धर्तीवर खबरदारी म्हणून पालिकेनं हे आवाहन केलं आहे. अनेकदा या लाटा इतक्या अजस्त्र असतात की, मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक महत्त्वं असणाऱ्य़ा वास्तूनजीकही या लाटा धडकून मोठं नुकसान करताना दिसतात.
पालिकेनं पूर्वसूटना देत दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण येणार आहे. यादरम्यान पावसाचं प्रमाण वाढल्यास समुद्राला भरती असताना त्याच वेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी शहरातील सखल भागांमध्ये साचून जनजीवन विस्कळीत करण्याती शक्यताही नाकारता येत नाही.
महिन्यानुसार भरती, हाय टाईडचं वेळापत्रक…
| जून | जुलै | ऑगस्ट | सप्टेंबर |
| 24- 11.15 वाजता- 4.59 मीटर | 24- 11.57 वाजता- 4.57 मीटर | 10- 12.47 वाजता- 4.50 मीटर | 8- 12.10 वाजता- 4.57 मीटर |
| 25- 12.05 वाजता- 4.71 मीटर | 25- 12.40 वाजता- 4.66 मीटर | 11- 13.19 वाजता- 4.58 मीटर | 9 – 12.41 वाजता- 4.63 मीटर |
| 26 – 12.55 वाजता- 4.75 मीटर | 26 – 13.20 वाजता- 4.67 मीटर | 12- 13.52 वाजता- 4.58 मीटर | 10- 1.15 वाजता- 4.59 मीटर |
| 27- 13.40 वाजता- 4.73 मीटर | 27- 13.56 वाजता- 4.60 मीटर | 23 – 12.16 वाजता- 4.54 मीटर | 11- 1.58 वाजता- 4.59 मीटर |
| 28- 14.26 वाजता- 4.64 मीटर | 24 – 12.48 वाजता- 4.53 मीटर |
