पश्चिम उपनगरातील एका रहिवासी सोसायटीमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव होता. सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोलसाठी वृद्ध डॉक्टरने गुगलवरून स्थानिक पालिका कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. समोरील व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी ५० रुपये भरायला सांगून तब्बल १६ लाख रुपये डॉक्टरच्या बँक खात्यामधून परस्पर वळविले. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खार पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये ८७ वर्षीय महिला डॉक्टर वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये डासांनी प्रचंड उच्छाद मांडला होता. सोसायटीमध्ये फवारणी तसेच पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरविण्यात आले. खार पश्चिम येथील स्थानिक पालिका कार्यालयाचा संपर्क क्रमांक कुणाकडेच नव्हता.
डॉक्टरने गुगल सर्च इंजिनवर जाऊन क्रमांक शोधला. त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. यावर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने पालिका कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. डासांचे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये भरून नोंदणी करावी लागेल, असे या कथित कर्मचाऱ्याने सांगितले.
पालिकेतर्फे फवारणी, पेस्ट कंट्रोल ही सेवा मोफत दिली जात आहे, मात्र नोंदणीसाठी पैसे भरावे लागतील असेही हा कर्मचारी म्हणाला. त्यावर मला ऑनलाइन पैसे पाठवता येत नसल्याचे डॉक्टरने सांगताच समोरील व्यक्तीने त्यांच्या बँक खात्याचा तपशील घेतला. बराच उशीर डॉक्टरने फोनवर व्यग्र ठेवल्यानंतर कर्मचाऱ्याने फोन ठेवला.
त्यावेळी एकापाठोपाठ एक संदेश त्यांच्या मोबाइलवर आले. अडीच लाख रुपये वळते करण्यात आल्याचे हे संदेश होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यामधून १६ लाख १४ हजार काढल्याचे दिसले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
